Ad will apear here
Next
भूतबंगल्यातली दिवाळी
बोरीवलीच्या ज्योती जोगळेकर यांनी नागपूरला भूतबंगला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगल्यात साजऱ्या केलेल्या दिवाळीबद्दलच्या जागवलेल्या या आठवणी...
............
आज मी ७२ वर्षांची आहे. मी जी आठवण सांगणार आहे ती साधारण १९९१-९२च्या आसपासची आहे. त्या वेळी पतीची नागपूरला बदली झाली आणि तिथं राहायला चक्क बंगला मिळाला. तो भूतबंगला होता. पूर्वी कधी काळी तिथे स्मशान होते म्हणे. मी भुता-खेतांच्या गोष्टींना घाबरत नव्हते. माणसं तर त्याहून खतरनाक असतात आजकाल. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात आम्ही तिथं गेलो होतो. लगेचच दिवाळी होती. वसुबारसेला मी उपवास केला. दररोज गोग्रासही ठेवू लागले. अनायासे बंगला मिळाला होता, तर भरपूर दिवे लावले. रोषणाई केली. भुतं प्रकाशाला घाबरतात म्हणे. 

धनत्रयोदशीला धन्वंतरी पूजन केले. योगाची कार्यशाळा घेतली. धन्वंतरी म्हणजे देवांचा वैद्य. ‘करा योग, राहा निरोग’ यानुसार तिथे राहणाऱ्या अनेक जणांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. 

दुसरा दिवस नरक चतुर्दशीचा. भगवान श्रीकृष्णाने नरकासुराला कसे मारले, त्याचे कीर्तन सुरू होते रेडिओवर. मंगलस्नानं झाली. आकाशकंदील तयार करून विकणाऱ्या मुलांना मी फराळासाठी बोलावलं होतं. ती फराळासाठी आली. फराळाचे पदार्थही मी एका गरीब गृहिणीकडून बनवून घेतले होते. नवरा मोती साबण आणि उटण्यानं मंगल स्नान करून कामावर गेला होता. त्या मुलांनाही बहुधा कोणीतरी सांगितले असावे, की हा भुताचा बंगला आहे म्हणून. ती मला विचारत होती, ‘काकू, तुम्हाला भुताची भीती नाही का वाटत?’ मी त्यांना गमतीत म्हटलं, ‘तुम्हाला पाहून भुतं केव्हाच पळून गेली.’ त्या मुलांना दिवाळी भेट म्हणून मी बालसाहित्याची पुस्तकं दिली. फटाके फार वाजवू नका, असंही सांगितलं. 

नंतर लक्ष्मीपूजनाचा दिवस होता. नवऱ्याने एक चांदीचं, लक्ष्मीचं नाणं आणून दिलं, त्याची पूजा केली. कचरा गोळा करणारी एक बाई त्या दिवशी आली होती. योगायोगाने तिचं नाव लक्ष्मी होतं. तिला फराळ दिला, ओटी भरली. पाडव्याला नवऱ्याने एक रुपयाची दहा नाणी ओवाळणीत घातली. त्यातलीच पाच त्याला दुसऱ्या दिवशी बससाठी दिली. 

भाऊबीज झाली आणि दिवाळी संपली. नवरा पुन्हा ऑफिसला जाऊ लागला. त्याला सख्खी बहीण नाही. नागपुरात बहीण कुठून मिळणार? पण त्याला मिळाली. ऑफिसमध्ये एक बाई त्याच्या टेबलाजवळ आली. तिचे जे काम होते, ते त्याने पटकन केले. शिवाय चहावाला आला, तेव्हा त्याने त्या बाईलाही एक चहा द्यायला लावला. ती बाई खूपच प्रभावित झाली. पटकन कामही केलं आणि वर चहाही विचारला, याचं तिला फार कौतुक वाटलं. ती बाई परत आली. नवऱ्याला वाटले, काही काम आहे. त्या बाईनं एक पाकीट त्याच्या हातात दिलं आणि म्हणाली, ‘मला तुमचा रेट माहीत नाही; पण या पाकिटात ३०० रुपये आहेत. माझ्याकडून ही छोटीशी भेट.’ इतक्यात तो म्हणाला, ‘मला माझ्या कामाचे पैसे मिळतात, हे मला नको. तुमच्याच मुलांना होतील त्यापेक्षा..’ हे ऐकून त्या बाईच्या डोळ्यांत पाणी आले. ती एक वेश्या होती. ‘ही बहिणीची ओवाळणी समजून घ्या..’ असं म्हणू लागली. नवरा म्हणाला, ‘ओवाळणी तर भावानं द्यायची असते.’ ती म्हणाली, ‘माझं काम केलंत, मला चहाही दिलात. यातच तुमची ओवाळणी आली. तेव्हा आता तुम्ही ते पाकीट घेतलेच पाहिजेत.’ खूपदा नाही म्हणूनही ती ऐकायलाच तयार नव्हती. नवरा तिला घरी घेऊन आला. तिने ते पैशाचं पाकीट माझ्याकडे दिलं. 

त्या भूतबंगल्यात आम्ही पुढची सहा वर्षं काढली; पण आम्हाला ना कधी भुतांचा त्रास झाला, ना त्यांच्यापेक्षा खतरनाक असणाऱ्या माणसांचा

संपर्क : ज्योती मनोहर जोगळेकर, बोरीवली, मुंबई
मोबाइल : ७०३९७ ८३९८०, ८१०८७ ९२०८८

(‘आठवणीतली दिवाळी’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी https://goo.gl/riz56x या लिंकवर क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZXNBU
Similar Posts
पोरबंदरमधल्या दिवाळीची आठवण काही कामानिमित्त पोरबंदरला गेलेल्या मनोहर जोगळेकर यांना दिवाळीच्या कालावधीतही तिथेच राहावे लागले होते. त्या वेळच्या आठवणी जागवणारा हा त्यांचा लेख...
आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरलेली दिवाळी... दिवाळीत केलेला व्यवसाय हा आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ कसा ठरला, याबद्दल लिहीत आहेत बोरीवलीचे नितीन जोगळेकर...
दिवाळीच्या अविस्मरणीय क्षणांची शिदोरी सध्या रत्नागिरीत असलेल्या आणि पुणे जिल्ह्यातील कराळेवाडीत माहेर असलेल्या रेश्मा मोंडकर (पूर्वाश्रमीच्या संगीता कराळे) यांनी त्यांच्या लहानपणीच्या दिवाळीच्या स्मृतींना दिलेला हा उजाळा...
पश्चिम बंगालमधली आगळी दिवाळी देशाच्या अन्य प्रांतांतही महाराष्ट्राएवढी मोठ्या प्रमाणावर नसली, तरी दिवाळी साजरी केली जातेच. सध्या पुण्यात असलेल्या श्रीया निखिल गोळे या पूर्वाश्रमीच्या चंद्रानी डे. त्यांचे माहेर कोलकात्याला. बंगाल प्रांतातली दिवाळी कशी असते, याबद्दल त्यांनी सांगितलेली माहिती त्यांची नणंद मधुरा महेश ताम्हनकर यांनी शब्दबद्ध केली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language